मराठा आरक्षणाचा विजय; लोहारा शहरात जल्लोष

लोहारा (जि. धाराशिव): मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला मोठ यश मिळालं आहे. राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत तसा शासन अध्यादेश काढला आहे. आरक्षणाचा अध्यादेश काढताच लोहारा शहरातील मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवले.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडले होते. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकणारं आरक्षण देण्याकरता सरकार प्रयत्न करत होते. अखेर मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आरक्षण मिळाल्याचे कळताच मराठा बांधवांनी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केले. दरम्यान, मराठा बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गावरून वाजतगाजत फेरी काढली. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटलाचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या. दीर्घ कालावधीच्या लढ्यानंतर आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याचा आनंद मराठा बांधवांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. यावेळी श्रीकांत भरारे, नरदेव कदम, बाळासाहेब पाटील, नाना पाटील, अभिमान खराडे, लक्ष्मण रसाळ, शहाजी जाधव, नामदेव लोभे, प्रकाश भगत, उत्तम पाटील, बाबू जावळे, सोपान शिंदे, पिंटू गोरे, बाबूराव पवार, शरद पवार, सुखा सातपुते, भागवत गरड, सचिन भरारे, किसन सातपुते, किरण चिंचोले, अशोक गोरे, अवधुत गोरे, नेताजी गोरे, विजय पाटील, रमेश पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

