ईतर

सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. आनंद मुदकण्णा यांचे निधन: उमरगा-लोहारा तालुक्यात शोककळा

मुरूम (जि. धाराशिव) : मुरूमचे सुपुत्र प्रख्यात मेंदू विकार तज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) डॉ. आनंद लिंबणप्पा मुदकण्णा यांचे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. २७) रोजी दुःखद निधन झाले. अल्पावधीतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेतली होती. सोलापूर शहरात भव्य स्पर्श न्यूरो केअर हॉस्पिटल काढून रुग्णांची सेवा करत होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू, संवेदनशील व अभ्यासू असल्याने राज्यातील व राज्याबाहेरील देखील हजारो रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. रुग्णांचा त्यांच्यावर मोठा विश्वास असल्याने त्यांचा रुग्णांना आधार वाटायचा. डॉ. मुदकण्णा हे महाराष्ट्रातील नावाजलेल्या न्यूरोलॉजिस्ट पैकी एक सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांचे वडील डॉ. लिंबणप्पा मुदकण्णा हे अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. डॉ. आनंद मुदकण्णा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकलूज येथे झाले. उमरगा येथे अकरावी, बारावी तर एमबीबीएसचे शिक्षण अंबेजोगाईला पूर्ण केले. त्यांचे एमडी चे शिक्षण सोलापूर तर डीएम न्यूरोलॉजीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात टॉपर विद्यार्थी म्हणून पूर्ण केले. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दल विविध संस्था, सामाजिक संघटनांनी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. कोरोना काळात ही त्यांनी रुग्णांची तत्परतेने सेवा केली. त्यांनी जवळपास वीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या विविध रुग्णालयात भेटीचे दिवस ठरलेले असायचे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मुरूम शहर व जिल्हाभर शोककळा पसरली. त्यांच्यावरती कंटेकुर रोडवरील शेतामध्ये बुधवारी (ता. २८) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. मुरूम चे सुप्रसिद्ध डॉ. लिंबणप्पा मुदकण्णा यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close