चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी केली जप्त

लोहारा (जि. धाराशिव): काही दिवसापूर्वी चोरीला गेलेली युनीकॉर्न मोसा कंपनीची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. लोहारा पोलिसांनी दुचाकी जप्त करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
मागील काही महिन्यांपासून शहर परिसरात दुचाकी चोरीला जण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी लोहारा पोलिसांत दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सास्तूर दूरक्षेत्र येथील पोलिस हवलदार विठ्ठल ढवण, रामप्रसाद सांगवे हे शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गस्त घालताना सास्तूर ते माकणी रस्त्यावरील सामाजिक वनीकरणात बेवारस दुचाकी असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक अजीत चिंतले यांनी कानेगाव बीट अंमलदार अर्जुन तिगाडे यांना सतर्क करून घटनास्थळी पाठवले. बीट अंमलदार तिगाडे यांनी हवलदार ढवण, सांगवे यांच्याबरोबर दोन पंचांना घेऊन युनीकॉर्न कंपनीची दुचाकीचा (क्रमांक एमएच-२५-बीसी-८७१७) पंचनामा केला. सदरची दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस दुचाकी चोराचा शोध घेत आहेत.

