
लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहरातील शासकीय धान्य गोदामाजवळ उभारण्यात आलेला अनधिकृत घनकचरा प्रकल्प तातडीने हटवावा, तसेच संबंधित नगरपंचायत पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
घनकचरा प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग व पर्यावरण विषयक इतर संबधित विभागांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नगरपंचायतीने हा प्रकल्प सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकल्पाची जागा ही शासकीय धान्य गोदामाच्या अत्यंत जवळ असून, या ठिकाणी शहरासह तालुक्यातील शासकीय धान्य साठवले जाते. त्यामुळे घनकचऱ्यामुळे धान्य खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, संबंधित परिसरात मंदिर, मस्जिद, कब्रस्थान यांसारखी धार्मिक स्थळे असल्याने, घनकचरा प्रकल्पामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. नगरपंचायतीने सर्व नियम धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू केला आहे, असा गंभीर आरोप तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी केला.
नगरपंचायतच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, शासकीय जमिनीचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. धार्मिक स्थळे, वसाहती व धान्य गोदामाजवळील घनकचरा प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवण्यात यावा, अशा मागण्याचे निवेदन तहसील, जिल्हा प्रशासनाला दिले आहे. उपोषण स्थळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला नाही, तर व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा बिराजदार यांनी दिला आहे.
दरम्यान, लोहारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी उपोषणकर्ते अमोल बिराजदार यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. जोपर्यंत नगरपंचायतीच्या दोषी पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.

