राजकिय

मोदी सरकारची संकल्प यात्रा नागरिकांनी उधळून लावली

लोहारा (जि. धाराशिव): मोदी सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेला आता ठिकठिकाणी तीव्र विरोध होत आहे. लोहारा शहरात शुक्रवारी (दि. १२) संकल्प यात्रा आली होती. यावेळी येथील नागरिकांनी ही यात्रा उधळून लावली. प्रत्येक गावांत मोदी यांच्या सकल्प यात्रेला विरोध होत असल्याने भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.
दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची व योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र विकसीत भारत संकल्प यात्रा देशभरात काढली आहे. ‘मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी’ अशी टॅगलाईन देत चित्ररथ काढण्यात आला आहे. या चित्र रथाच्यामाध्यमातून विविध योजनेची माहीती नागरिकांना दिली जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी संकल्प यात्रा लोहारा शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नगरपंचायत कार्यालयासमोर विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. आठवडे बाजार असल्याने उपस्थित नागरिकांची संख्या मोठी होती. कार्यक्रमासाठी पाटोदाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ वातुकीची कोंडी झाली. कार्यक्रमात मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी या चित्ररथावरून योजनेची माहिती दिली जात असताना उपस्थित नागरिकांनी सर्व योजना फसव्या आहेत. यांचा कोणालाही फारसा लाभ मिळत नसल्याचा आरोप करून रथ यात्रेवर लिहिल्या ‘मोदी सरकार’ यावर आक्षेप घेत कार्यक्रम बंद पाडला. कार्यक्रम भारत सरकारचा आहे की नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा आहे? असा प्रश्न उपस्थित करीत जनतेच्या पैशांतून एका पक्षाचा प्रचार केला जात असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना ठोस उत्तरे देता आली नाहीत. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांचा तीव्र विरोध होत असल्याचे पाहून कार्यक्रम गुंडाळण्यात आला. अमोल बिराजदार, दीपक मुळे, सलीम शेख, महेबूब गवंडी, हरी लोखंडे, श्याम नारायणकर, बालाजी माशाळकर, राजेंद्र कदम, नवाज सय्यद, पिंटू गोरे, बालाजी जाधव, अनिल मोरे, महेश बिराजदार यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेत संकल्प यात्रा उधळून लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close