लोहारा शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात, जय भवानी मंडळांकडून अन्नछत्र सुरू

लोहारा (जि. धाराशिव): शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार घटस्थापनेने सुरुवात झाली. शहरातील आझाद चौकातील जगदंबा मंदिर, राज चौकातील अंबाबाई मंदिरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर विधिवत देवीच्या मूर्तीची पूजा करण्यात आले.
शहरासह ग्रामीण भागात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता मंगळवारी (ता. २४) दसऱ्याने होणार आहे. तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी रविवारी घटस्थापन करून देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यातबरोबर भक्तांनीही आपआपल्या घटस्थापना केली. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाह प्रबोधनात्मक मनोरंजनाचे आयाोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नवरात्रीत नऊ रंगांना खूप महत्व दिले जाते. या नऊ दिवसांतील पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी ता. १५ केशरी, १६ रोजी पांढरा, १७ रोजी लाल, १८ रोजी निळा, १९ रोजी पिवळा, २० रोजी हिरवा, २१ रोजी राखाडी, २२ रोजी जांभळा, २३ रोजी मोरपंखी या रंगाचा वापर केला जाणार आहे. महिलावर्गात या रंगाचे खास आकर्षण असते. यासाठी प्रत्येक दिवशी या रंगाच्या साडी परिधान केल्या जातात. तसेच काही पुरुषांकडूनही रोज या वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
जयभवानी मंडळांकडून अन्नछत्र सुरू
कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातील भाविक तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी लोहारा मार्गे तुळजापूरला पायी जातात. पायी जाणाऱ्या भाविकांची चहा, नाश्ता, जेवणाची सोय व्हावी, यासाठी शहरातील जयभवानी मंडळांकडून अन्नछत्र चालविले जाते. यंदा मंडळाच्या अन्नछत्राचे १७ वे वर्ष आहे. रविवारी (ता. १४) अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले. अन्नछत्रासाठी हेमंत माळवदकर, माजी सरपंच नवाज सय्यद, रघुवीर घोडके, अमोल फरिदाबादकर, संतोष माळवदकर, भगवान मक्तेदार, शरण्णप्पा कुंभार, जितेंद्र रोडगे, अशीष जेवळीकर, पप्पू स्वामी यांनी पुढाकर घेतला आहे.





