कानेगावचे सरपंच नामदेव लोभे अपात्र; औरंगाबाद उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील कानेगाव येथील सरपंच नामदेव लोभे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते. सरपंच लोभे यांनी औरंगाबद उच्च न्यायालयात धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतु, शुक्रवारी (ता. ६) झालेल्या सुनावनीत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवत सरपंच लोभे यांना अपात्र ठरविले आहे. कानेगावचे सरपंच नामदेव लोभे यांच्या विरोधात जगताप व इतर, अमोल पाटील नितीन पाटील इतर लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारीमध्ये सरपंच लोभे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये आवश्यक असणाऱ्या आर्थिक वर्षातील किमान चार ग्रामसभा घेतलेल्या नाहीत. त्यामुळे ते सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरतात. तसेच दुसऱ्या तक्रारीमध्ये सरपंच लोभे यांनी तीन मासिक सभेचे आयोजन करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे लोभे यांना पुढील कालावधी करिता सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात यावे, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत सरपंच नामदेव लोभे यांना अपात्र ठरवित इथून पुढील काळाकरिता ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच म्हणून राहण्यास किंवा निवडून येण्यास अपात्र झाले असल्याचा निर्णय ता. २ एप्रिल २०२४ ला दिला होता. जिल्हाधिकाऱ्यानी दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत सरपंच लोभे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ग्रामसभा न घेतल्याचे योग्य कारण दिलेले नसल्याने नामदेव लोभे यांच्याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. प्रकरणातील फिर्यादी अमोल पाटील नितीन पाटील व इतर यांच्या वतीने विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांनी काम पाहिले त्यांना विधीज्ञ अमोल जगताप यांनी सहकार्य केले.

