आदर्श माता- आदर्श नारी’ पुरस्काराने गयाबाई शिंदे सन्मानित

लोहारा (जि. धाराशिव): अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महारष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त देण्यात येणारा ‘आदर्श माता-आदर्श नारी’ पुरस्कार माकणी येथील गयाबाई शिंदे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
माकणी येथील उच्च शिक्षित कुटुंब घडवणाऱ्या गयाबाई शिंदे आणि त्यांचे पती प्रभाकर शिंदे हे पूर्ण अशिक्षित आहेत. घरामध्ये अतिशय हलाकीची परिस्तिथीमुळे पती सालगडी म्हणून कामे करत तर स्वत: शेतमजूर म्हणून काम केले. आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य लेकरांच्या नशिबी येऊ नये, या जिद्दीने त्यांनी मुलांना शाळा शिकवायचे ठरवले. मात्र, पती प्रभाकर शिंदे यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचलेल्या गयाबाईंनी हार न मानता आपल्या मुलांचे भविष्य उज्वल व्हावे, यासाठी आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात मुलांना उच्च शिक्षण दिले.
त्यांची मुले महादेव प्रभाकर शिंदे यांचे शिक्षण रसायनशास्त्र या विषयात सेट, नेट (JRF), पीएचडी (पुणे विद्यापीठ), पोस्ट डॉक्टरेट (साऊथ कोरियातून) त्याच बरोबर विशेष बाब म्हणजे तत्कालीन भारताचे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘भूकंपग्रस्त आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर अमेरिकेमधील विशेष फेलोशिपधारक आहेत. सद्या ते वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगा बळिराम प्रभाकर शिंदे हा महसूल खात्यामध्ये कार्यरत आहे. त्यांचा तिसरा मुलगा विष्णू शिंदे, सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून समाजशास्त्र या विषयात पीएचडी करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी नॉर्वे येथील युएसएन या विद्यापीठातर्फे नार्वे या देशात जाऊन संशोधन करण्यासाठी त्यांना ‘इंटरनॅशनल मोबिलिटी फेलोशिप २०२३’ जाहीर झाली आहे. सद्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दोन मुली सविता आणि मनीषा या उच्चशिक्षित असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या प्रेरणेतून गयाबाई शिंदे यांच्या दोन्ही मुलांनी सामाजिक संस्थेची स्थापना करून गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी भरीव मदत करीत आहेत.
या पुरस्काराचे वितरण रविवारी २३ मार्च रोजी करण्यात आले. माजी मंत्री, विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील, अॅड. मीरा कुलकर्णी यांच्या हस्ते गयाबाई यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य शिक्षण परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख पल्लवी पिसे, अंजली काळे, दिपाली काळे, दैवशाला हाके, महाराष्ट्र राज्य शिक्षक महिला आघाडी धाराशिव जिल्हा शाखा पदाधिकारी ज्योती राऊत, ज्योती साकोळे, प्रमिला वाघे, रेखा डाके, माकणी येथील आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी आदी उपस्थित होते.

