प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महिला व कर्मचारी संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन

लोहारा (जि. धाराशिव): उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (ता. तीन) तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) तालुक्यात हजारो महिला स्वयंसहायता समूहामार्फत जोडल्या गेल्या आहेत. या महिलांना प्रशिक्षण देणे, वित्तीय व्यवस्थापानाचे महत्त्व तसेच त्यांच्या उपजीविकेमध्ये वाढ होण्यासाठी उमेदचे कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस परिश्रम करून अभियानासाठी काम करीत आहेत. परंतु, त्यांच्या मगण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. १० ते १२ जुलैदरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी केलेली नाही. त्यामुळे अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरुपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या प्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा, या मागण्यांसाठी बेमुदत काम बंद करून तहसील कार्यालयासमोर ठिषय्या आंदोलन केले. आंदोलनात सचिन ठोकळ, उत्कर्ष पाटील, राहुल मोहरे, अविनाश चव्हाण, रामेश्वर दुरगळे, शिवशंकर कांबळे, प्रीतम बनसोडे, सौरभ जगताप आदी सहभागी झाले आहेत.





