धानुरी येथील विद्यामाता शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राधाकृष्णांची वेशभूषा परिधान करून जन्माष्टमी सोहळ्यात सहभाग नोंदविला. त्यानंतर चिमुकल्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाल्याने आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २६) विद्यामाता स्कूलमध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तीन थरांचे मानवी मनोरे उभे करून ‘गोविंदा आला रे’चा जयघोष करीत दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सुरज हावळे-सोलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

