विश्वशांतीकरिता सर्वांनी संघटीत होणे गरजेचे: बसवराज पाटील

मुरुम (जि. धाराशिव): लिंगायत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा उद्देश खूप महत्त्वाचा असून हे पहिल्यांदाच घडते आहे. या समाजातून देशाचे नेतृत्व करणारे सात वेळा खासदार होऊन माजी केंद्रिय गृहमंत्री तथा माझे गुरुवर्य शिवराज पाटील चाकूरकरांनी खूप चांगले योगदान देऊन त्यांनी त्या काळात राजकीय इतिहास रचला. केवळ समाजच नव्हे तर अन्य समाजाने देखील आम्हाला फार मोठी मदतच केली म्हणूनच आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राहू शकलो. येणाऱ्या काळात ही यात्रा केवळ राज्यापूर्ती मर्यादित न राहता देश पातळीवर पोचली पाहिजे. मानवधर्म हा श्रेष्ठ धर्म असल्याचे सांगून विश्वशांतीकरिता सर्वांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बसवराज यांनी केले. लिंगायत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा ता. २१ सप्टेंबर रोजी मंगळवेढ़ा येथे समारोप होत आहे. त्यानिमित्त मुरूम येथे आयजित कार्यक्रमामध्ये बसवराज पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, हिंदू विरशैव लिंगायत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम, संयोजक नितीन शेटे, चंद्रशेखर स्वामी, मराठवाडा नेता दैनिकाचे संपादक रामेश्वर बध्दर, शिवलिंग स्वामी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांची ची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. गोपछडे म्हणाले की, सदर यात्रा ही १६ जिल्ह्यातून ५७ विधानसभा मतदारसंघातून निघालेली असून संपूर्ण लिंगायत समाजाला संघटित करून एक व्हा. संघटित झालो तर राजकीय नेतृत्व विकसित होईल. यासाठी रचनात्मक कार्य करूयात. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविणे, लिंगायत समाजातील मुला-मुलींसाठी वस्तिगृह उभारणे, संपूर्ण लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था, शिवाचार्य महास्वामींना संरक्षण आदी मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात लिंगायत समाजाच्या ५० पोटजाती असून या समाजाचे १९८२ साली २२ आमदार होते. मात्र आज या समाजाची राज्यात दीड कोटी लोकसंख्या असतानाही केवळ आमदारांची संख्या नगण्य स्वरूपात आहे. तेव्हा बसवराज पाटलांसारखे नेतृत्व या समाजाला लाभल्याने त्यांचा राजकीय व सामाजिक अनुभव माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ते माझे राजकीय गुरुच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण समाजाने एकत्रित येऊन समाजातील प्रश्न सोडविणे गरजेचे ते म्हणाले. सन्मान यात्रेचा समारोपाच्या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने राज्यातून जास्तीत जास्त संख्येने लिंगायत समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. याप्रसंगी नगर शिक्षण विकास मंडळामार्फत बसवराज पाटील, बापूराव पाटील यांच्या हस्ते खा. अजित गोपछडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन शेटे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातून बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

