शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोहारा (जि. धाराशिव): महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शक्ति कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरात बुधवारी (ता. २८) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थिनी, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी ‘शक्ती कायदा’ अंमलात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शक्ती कायदा अंमलात आणला गेला नाही. त्यामुळे गुन्हेगारावर वचक बसत नाही. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायदा अंमलबजावणी करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, नेताजी सुभाष चंद्रबोस महाविद्यालयाध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर बोरकर,युवतीसेना जिल्हा विस्तारक स्वाती बोरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, नगरसेविका मयूरी बिराजदार, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगराध्यक्ष पौर्णिमाताई लांडगे, डॉ. सुवर्णमाला नारायणकर, शिवदूत मेहबूब गवंडी, रघुवीर घोडके, श्याम नारायणकर, तुकाराम वाकळे, नितीन जाधव आदी उपस्थित होते.





