धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची बीड जिल्ह्यात कारवाई; १० हजाराची लाच घेताना कृषी विस्तार अधिकाऱ्याला अटक

धाराशिव: तक्रारदाराचे पाटोदा (जि. बीड) येथे कृषी सेवा केंद्र दुकान आहे. दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी तसेच वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी (वर्ग ३) जयेश मुकुंद भुतपल्ले, (वय ३६) यांनी ता. ६ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी सापळा रचून ता. ४ आक्टोंबर रोजी आरोपी कृषी विस्तार अधिकारी जयेश भुतपल्ले पंचा समक्ष १० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपीला लाचलुचपक प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. पाटोदा (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्ष संदीप आटोळे, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलिस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.

