सामाजिक

मंगळागौरी स्पर्धेत लोहारा शहरातील महिलांनी मारली बाजी; पन्नास हजाराचे पहिले पारितोषिक पटकाविले

लेडीज क्लब उस्मानाबाद येथे झाल्या स्पर्धा

धाराशिव: येथील लेडीज क्लब उस्मानाबादच्या वतीने जिल्हास्तरी मंगळागौरी स्पर्धा २०२३ मंगळवारी (ता. २९) रोजी घेण्यात आली. या स्पर्धांत जिल्हाभरातील महिलांच्या ग्रुपनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जिल्हापरिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षा अर्चना पाटील या महिला सक्षमीकरणासाठी नेहमी अग्रेस असतात. महिलांचे व्यक्तीमत्व विकसीत करून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी अर्चना पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी महिलांसाठी मंगळागौरी स्पर्धांचे आयोजन केले जाते. लेडीज क्लबमध्ये मंगळवारी मंगळागौरी स्पर्धा मोठ्या उत्साही, आनंदी वातावरणात पार पडली. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक महिला ग्रुपने आपल्या विविध कलांचे सादरीकरण करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
लोहारा शहरातील सप्तशृंगी ग्रुप ठरला प्रथम
अतिशय उत्साही वातावरणात पार पडलेल्या मंगळागौरी स्पर्धेत लोहारा शहरातील सप्तशृंगी ग्रुपने सर्व स्पर्धकांवर मात करीत पहिला क्रमांक मिळवित ५०,००० (पन्नास हजार) रूपयांचे रोख पारितोषिक मिळविले. सप्तशृंगी ग्रुपने अंकिता कांबळे (डॉली) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम क्रमांक पटकावला. सप्तशृंगी ग्रुपने या स्पर्धेत भारतीय पारंपारिक नृत्यातून बालविवाह प्रतिबंध याविषयी सामजिक संदेश दिला. तसेच फुगडी, झिम्मा, कोंबडा, झोका, सूप – कलशी या महाराष्ट्रीयन खेळांचे सादरीकरण केले. सप्तशृंगी ग्रुपमध्ये ललिता कांबळे, सविता जाधव, ज्योत्स्ना चांदणे, भाग्यश्री कुंभार, प्रियांका भंडारे, प्रणाली सावंत, मनिषा राठोड, शीतल पांचाळ या सहभागी झाल्या होत्या. लेडीज क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते रोख रक्कमेसह प्रमाणपत्र, पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला रसिकांची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close