मुरूम शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची जल्लोषात मिरवणूक
आकर्षक फलक, बोलके देखावे, विविध कलाकृतीने वेधले लक्ष

मुरूम (जि. धाराशिव): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनमित्त मुरूम शहरातून रविवारी (दि. २५) सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. साठे चौकातून सायंकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला. उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, पंकज बनसोडे, लखन देडे, बंडू कांबळे, राजेंद्र देडे, अमित देडे, किरण देडे, तुळशीराम देडे, रघुनाथ बनसोडे, विनायक देडे, सचिन जाधव, शंकर पाटोळे, गुलाब क्षीरसागर, ईश्वर क्षीरसागर आदींनी पुढाकार घेतला. हलग्यांच्या कडकडाटात डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील विशेष देखावा शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय बनला होता. देखाव्यात अण्णाभाऊ म्हणायचे ” पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे.” असे फलक, फिरत्या पृथ्वीचा देखावा, देशभरात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबद्दलचे निषेधाचे फलक तर मागील ट्रॅक्टरमध्ये अण्णाभाऊ साठेंची पूर्णाकृती मूर्ती व त्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंनी आपल्या तेजोमय आयुष्यात लिखाण केलेल्या साहित्यांचे फलक दोन्ही बाजूने लावण्यात आले होते. याशिवाय पुतळ्याच्या मागील बाजूस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिकारक वीर लहुजी साळवे यांचे फोटो व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक महापुरुषांचे फोटो महाराष्ट्राच्या नकाशात देखाव्याच्या रुपाने अण्णाभाऊ साठेंच्या चरित्र व विचारांचा जागर करण्याचे काम जयंती उत्सव मंडळाने केले. यंदा काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील आकर्षक देखावे हे शहरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता.





