नेत्र शिबिरातील रुग्णांवर केली मोतीबिंदू शस्त्रक्रिया: सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने घेतला पुढाकार

आष्टाकासार (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून परिसरातील नऊ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. संस्थेने ता. ४ सप्टेंबर रोजी दंत व नेत्र शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे ३०० रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. त्यात मोतीबिंदूचे नऊ रूग्ण आढळून आले. धाराशिव येथील जे. एस. अजमेरा रोटरी क्लबच्या साहय्याने नऊ रूग्णांवर शुक्रवारी (ता. २०) मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अजमेरा रोटरी क्लबचे सचिव प्रमोद दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इसाके यांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदृष्टी प्रधान करून आता ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचे कार्य सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था करत आहे. या सामाजिक कार्याचा वासा सर्वांनी आंगिकारणे म्हत्वाचे आहे. सेवा देणारे अनेक आहेत, पण ती सेवा गरजवंतापर्यंत कशी पोहचवली पाहिजे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक संघटना असल्याचे सांगून अनुकरणीय उपक्रमाचे कौतुक स्वामी समर्थ मंडळाचे भक्त मुकेश मुळे यांनी केले. शिबिसाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव सुलतानपुरे, सचिव सिद्रामप्पा तडकले, सहसचिव सुभाष बलसुरे, मुरलीधर गोसावी, बनसोडे, वाघमोडे, नितीन अष्टेकर, चांद अष्टेकर, विष्णुपंत सगर, आळंगे, प्रा. तडकले,अण्णाराव पाटील, विलास पोतदार, शरणप्पा फुंड्डीपल्ले यांनी पुढाकार घेतला.

