ईतर

लोहारा तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी मंजूर; आमदार चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश

  • लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील जेवळी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. क्रीडासंकुलास निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना क्रीडा कौशल्य विकसीत करण्यास मदत होणार आहे.

लोहारा तालुक्यासाठी क्रीडा संकुल नसल्यामुळे या भागातील खेळाडूंना वंचित रहावे लागत होते. शहरात तालुकास्तरीर क्रीडा संकुल व्हावे, अशी खेळाडूसह नागरिकांची इच्छा होती. त्यानुसार प्रशासनाकडून जागेचा शोध घेतला. परंतु लोहारा शहरालगत क्रीडा संकुलसाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने काही वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यानंतर जेवळी ग्रामपंचायतीने जेवळी येथील सुमारे ८ एकर जागा उपलब्ध करून दिली. मात्र मागील वर्षभरांपासून निधीअभावी संकुल उभारण्याचे काम रखडले होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तालुका क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जातीने लक्ष घालून राज्य सरकारककडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून क्रीडा संकुलसाठी पाच कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाच कोटी रूपयांच्या मंजूर निधीतून जेवळी येथील तालुका क्रीडा संकुलात इनडोअर गेम हॉल, क्रीडा संकुलासाठी संरक्षक भिंत, क्रीडा संकुलातील विद्युतीकरण, क्रीडा संकुलातील पाणीपुरवठा व्यवस्था व ड्रेनेज व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इनडोअर गेम हॉलमुळे कुस्ती, बॅडमिंटन, तायक्वांदो, जुदो, कराटे, तलवारबाजी, कबड्डी, टेबल टेनिस, आदी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची सोय होणार आहे. या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close