क्राइम

लोहारा शहरात धाडसी चोरी; रोख रकमेसह पाच तोळे सोने लंपास

धाराशिव येथील श्वान पथकाला केले पाचारण

लोहारा (जि. धाराशिव): शहरात चोरट्यांनी एका घरावर डल्ला मारत पाच तोळे सोने व रोख तीन हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. १) सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील प्रभाग १४ मध्ये महादेव मोरे यांचे घर आहे. सोमवारी (ता. ३१) रात्री नेहमीप्रमाणे मोरे कुटुंबीय जेवण करून घरातील एका हॉलमध्ये झोपला होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम घराच्या चायना गेटचे कुलूप उघडले, त्यानंतर घरातील दोन दरवाज्यांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटातील पर्स शोधून त्यात ठेवलेले पाच तोळे सोन्याचे दागिने आणि तीन हजाराची रोकड लंपास केली. यात बोरमाळ, गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या, कानातील फुले, झुमके आदी दागिन्यांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मोरे कुटुंबीय झोपेतून जागी झाल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

दागिन्यांची पर्स घेऊन पोबारा केलेल्या चोरट्यांनी दागिने घेऊन घराच्या बाजूस असलेल्या शेतात रिकामी पर्स फेकून दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, हवलदार निरंजन माळी, आकाश भोसले यांनी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, तपासासाठी धाराशिव येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते; उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्वानपथक शहरात दाखल झाले. श्वानाने चोरट्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे वाहानातून निघून गेल्याने श्वान त्याच ठिकाणी घुटमळले. चोरीच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे, आवाहन सहायक पोलिस निरीक्षक कुकलारे यांनी केले असून, लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close