
लोहारा (धाराशिव): कंत्राटी भरतीवरून बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांनी माफी मागावी, यासाठी तालुका भाजपने शहरातील छत्रपती शिवाजी महारााज चौकात शनिवारी आंदोलन कले. कंत्राटी भरतीचे महापाप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यांनीच कंत्राट भरतीची टूम काढून राज्यातील लाखो बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप करीत महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, यासाठी तालुका भाजपच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी आंदोलन केले. यावेळी ‘माफी मागा’ यासह विविध आशयाचे फलक हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करुन निषेध केला. आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, सरचिटणीस इक्बाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाट, संपत देवकर, मल्लिनाथ फावडे, बाबा सुंबेकर, प्रतीक गिरी, काशिनाथ घोडके, यांच्यासह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.





