लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण द्या; लिंगायत महासंघाची मुख्यमंत्र्याकडे मागणी

लोहारा (जि. धाराशिव): लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लिंगायत महासंघाच्या वतीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंगळवारी (ता. तीन) एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी लिंगायत महासंघ गेली अनेक वर्षांपासून करीत आहे. महासंघाने आक्रमक भूमिका घेतल्याने २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी सरकारने नेमलेल्या लिंगायत समितीचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी समाजाची बाजू व्यवस्थित मांडली नसल्यामुळे केवळ वाणी नावाला आरक्षण लागू झाले. पण लिंगायत, हिंदू लिंगायत नावाने जातीची नोंद असलेल्या लाखो लिंगायतांना आराक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जुन्या काळातील नोंदीही तपासल्या गेल्या. परंतु त्या नोंदीही कुठे आढळल्या नाहीत. ही अडचण लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या मुंबईतील बैठकीत त्यावेळी सांगितले होते. त्यावर देवेंद्र फडवणीस यांनी एका महिन्यात हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे विद्यमान राज्य सरकारने मागणीची दखल घेत वाणी नावाला लागू असलेले आरक्षण सरकट लिंगायतांना लागू करण्यासाठी शुध्दीपत्रक काढावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना दिले आहे. यावेळी लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष शंकर जट्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मुळे, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, नगरसेवक जालिंदर कोकणे, भाजपाचे जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, कास्ती खुर्दचे सरपंच सागर पाटील, ब्रम्हानंद पाटील, बसवराज बिडवे, गणेश खबोले, विरेश स्वामी, संजय मिटकरी, सुनील ठेले, शिवमूर्ती मुळे, पवन स्वामी, शरणाप्पा शेकजी, परमेश्वर माशाळकर, उमा होंडराव, मल्लिनाथ बिराजदार, लक्ष्मण भुजबळ, मल्लिनाथ स्वामी, माणिक चिकटे आदी उपस्थित होते.

