‘उमेद’च्या आंदोलनाला महिला बचत गटांचा पाठिंबा: आंदोलनस्थळी घेतला मेळावा

लोहारा (जि. धाराशिव): प्रलंबित मागण्यांसाठी उमेदच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलांनी पाठिंबा देत शुक्रवारी (ता.चार) तहसील कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी तालुकास्तरीय मेळावा घेऊन शासनाचे लक्षवेधून घेतले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरुपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या प्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा, या मागण्यांसाठी उमेदच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून (ता. तीन) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. उमेदमुळे तालुक्यात हजारो महिला स्वयंसहायता समूहामार्फत जोडल्या गेल्या आहेत. या जोडले गेलेल्या महिलाबचत गटांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याच्या अनुसंगाने तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनस्थळी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी मेळावा घेत राज्य शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिलांना बचत गटाबाबत माहिती दिली. या वेळी बचगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनात उमेदचे कर्मचारी सचिन ठोकळ, उत्कर्ष पाटील, राहुल मोहरे, अविनाश चव्हाण, रामेश्वर दुरगळे, शिवशंकर कांबळे, प्रीतम बनसोडे, सौरभ जगताप आदी सहभागी झाले आहेत.

