शैक्षणिक

संवेदनशील मनाच्या आदर्श शिक्षिका वर्षा चौधरी!

शिक्षकदिन विशेष ....

लोहारा (जि. धाराशिव): शिक्षिका वर्षा चौधरी या
लोहारा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक केद्रीय शाळेत अध्यापन करतात. केवळ अद्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे त्यांचा विशेष कटाक्ष असतो. त्यासाठी त्या सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असतात. त्यामुळे वर्षा चौधरी यांना विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखले जाते. असे असले तरी त्या एक समाजभान असलेल्या संवेदनशील मनाच्या आदर्श शिक्षिका आहेत. त्यांनी चौथी वर्गातील अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा दहावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलून इतर शिक्षक, शिक्षिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

वर्षा चौधरी या गेली २२ वर्षांपासून अध्यापनाचं कार्य करताहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत २००१ मध्ये त्यांची प्रथम नेमणूक झाली. नऊ वर्ष सेवा झाल्यानंतर मार्डी येथील जिल्हा परिषद शाळेत सात वर्ष नोकरी केली. आता लोहारा शहरातील प्राथमिक केंद्रीय शाळेत २०१८ पासून कार्यरत आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी रास्त अपेक्षा असते. शिक्षक जसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असतो, तसाच तो समाजाला मार्गदर्शक करणारा एक सामाजिक अभियंतादेखील असतो, असे समजून आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणाऱ्या वर्षा चौधरी कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने अध्यापनाचे कार्य करीत आहेत. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून विद्यार्थ्यांना आपल्या खास शैलीत आणि सोप्या भाषेत अध्यापन करीत विद्यार्थ्यांचा बुद्यांक कसा वाढला जाईल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्या योग्य मार्गदर्शनही करतात. त्याचबरोबर सामाजिक कामातही त्यांचा मोठा सहभाग असतो. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे, रक्तादान शिबिराचे आयोजन, वृक्षलागवड व संवर्धन करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतात.  गरीब विद्यार्थ्यांचा उचलला शैक्षणिक खर्च….
समाजामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन मुलं शाळेला येण बंद कले जात असल्याचे पाहिल्यानंतर वर्षा चौधरी यांनी शाळेतील गरीब, होतकरू, अनाथ मुलांना दरवर्षी दत्तक घेऊन त्यांचा दहावीपर्यंतचा येणारा शैक्षणिक खर्च उचलत आहेत. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या परीने मदत करण्या प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यांनी लोक वर्गणीतून व स्व:खर्चाने शाळेतील वर्ग खोल्या डिजिटल केल्या आहेत. शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली आहे. त्यांच्या कार्याची दखलघेत त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच इतर अनेक पुरस्काराने वर्षा चौधरी यांना सन्मानित करण्यात आले आहे. “विद्यार्थी जेव्हा मोठे होतात, ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवतात त्यापेक्षाही महत्त्वाचे ते ‘आदर्श नागरिक’ बनतात. तीच खरी आमची पावती असते आणि हाच खरा पुरस्कार असतो”. अशी भावना शिक्षिका वर्षा चौधरी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त व्यक्त केली.
मिळालेले पुरस्कार…
🌟 सन २००४-५ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागूर यांच्या वतीने “आदर्श शिक्षिका” पुरस्कार
🌟 सन २००८-९ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी यांच्या वतीने “आदर्श शिक्षिका” पुरस्कार
🌟 सन २०१८-१९ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा यांच्या वतीने “सवित्री बाई फुले आदर्श शिक्षिका” पुरस्कार
🌟 सन ०१६-१७ मध्ये पंचायत समितीकडून तालुकास्तरीय “आदर्श शिक्षिका” पुरस्कार
🌟 सन २०२० मध्ये साप्ताहिक संपादक राज्य प्रत्रकार संघाकडून “शिक्षकरत्न” पुरस्कार
🌟 सन २०१६-१७ मध्ये लोकमंगल फॉउडेशनचा जिल्हास्तरीय “शिक्षकरत्न” पुरस्कार
🌟सन २०१९ मध्ये उमरगा-लोहारा तालुका “शिक्षकरत्न” पुरस्कार
🌟सन २०२०मध्ये सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसचा जिल्हास्तरीय “स्त्रीशक्ती” पुरस्कार
……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close