अवेळी पावसाचा फळबागांसह रब्बी पिकांना फटका

लोहारा (जि. धाराशिव): शहरासह परिसरात मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसाचा फटका ज्वारी, आंबा, द्राक्षबागांना बसला आहे. या वादळी पावसाचा अधिक फटका लोहारा मंडळा बसला असून पावसामुळे ज्वारी आडवी पडून नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस झाला नव्हता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसास सुरवात झाली. अर्धातास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने जोरदार सुरवात केली. विजांच्या कडकडाटासह सुमारे पाऊन तास पाऊस झाला. तालुक्यातील माकणी, जेवळी या मंडळातील काही भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, लोहारा मंडळात वादळी पाऊस झाला. मार्डी, कास्ती, लोहारा, नागूर, आरणी, कानेगाव, भातागळी या भागात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने काही भागातील ज्वारीचे उभे पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. आरणी, लोहारा शिवारातील पिकांना वादळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. लोहारा शिवारातील उमाकांत भरारे यांच्या शेतातील दोन एकरवरील ज्वारीचा फड वादळी पावसात उध्वस्त झाला आहे. या पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. द्राक्ष बागांचेही नुकसान झाले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी तारळकर यांनी नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना कृषी साहयकांना दिल्या आहेत. त्यानुसार कृषी साहयकांनी नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झाला नाही.

