नळदुर्ग येथील जुगार अड्ड्यावर छापा, नऊ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त, १३ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

धाराशिव: तुळजपूर तालुक्यातील नळदुर्ग येथे एका हॉटेलच्या बाजूच्या खोलीमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर जुगार विरोधी पोलिस पथकाने कारवाई केली. याप्रकरणी १३ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातील नऊ लाख ३८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नळदुर्ग येथील सत्यम हॉटेलच्या बाजुच्या एका बंद खोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिर्ट नावाचा जुगार खेळला जात होता. याची माहिती मिळताच जुगार विरोधी पोलिस पथकाने गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी आरोपी शिवराज शशिंकात भुमकर (वय ३५, रा. नळदुर्ग), चेतन बजरंग धतेकर (वय ३६ रा. धाराशिव, अजय दिलीप गायकवाड, (वय ३२ रा. नळदुर्ग), अतुल दिलीप ढोंगरे (वय ३० रा. नळदुर्ग), प्रसाद अर्जुन शिंदे (वय २३ रा. बोरगाव ता. औसा जि. लातूर), सागर शंकर कलशेट्टी (वय २९), अबुताहेर बडेसाब कुरेशी (वय ३८), इरफान हनिफ कुरेशी (वय ३५), मोहन शांताराम लोहार (वय २९), आदम अख्तर जहागीरदार (वय ३०), अंकुश अंबादास काळे (वय ३५), इरफान हसन शेख (वय ३५, सर्व रा. नळदुर्ग) हे तीर्ट नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातील जुगाराच्या साहित्यासह १७ हजार २०० रक्कमेसह महिंद्रा कंपनीची फोर व्हिलर, हिरो होन्डा मोटरसायकल व दहा ॲन्ड्राईड, आयफोन मोबाईल असा एकूण नऊ लाख ३८ हजार २०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १३ जुगाऱ्यासह जुगाराचा अड्डा चालविण्यास देणाऱ्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




