
लोहारा (जि. धाराशिव): केंद्रातील मोदी सरकारकडून राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेत्यांवर टार्गेट करून कारवाई केली जात असल्याचा आरोप करत लोहारा तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करीत तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना निवेदन दिले.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची केंद्र सरकारची कारवाई ही पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून काँग्रेस पक्ष आणि विशेषतः विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदान असलेल्या नेहरू-गांधी कुटुंबाशी संबंधित आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेची मालमत्ता जप्त करून काँग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या देशात संविधानिक संस्था आणि लोकशाही मूल्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. चौकशी संस्थांचा वापर विरोधी पक्षांना दडपण्यासाठी केला जात आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून यामुळे विरोधी आवाज दाबला जातोय. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय प्रेरणेने प्रेरित असून, त्यामागे कुठलाही वैध आधार नाही. लोहारा तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या या दडपशाही कारभाराचा तीव्र निषेध करण्यात येत असून, अशा प्रकारच्या कारवायांना लोकशाहीत थारा देता कामा नये, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, अॅड. सयाजी शिंदे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष मुकेश सोनकांबळे, कार्यकर्ते इस्माईल मुल्ला, बाबूराव ठोंबे, चंद्रकांत साखरे, कांत गोरे आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





