बौद्ध बांधवांचे मराठा आरक्षणाला समर्थन, उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तहसीलदारांना दिले निवेदन

लोहारा (जि. धाराशिव): मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास लोहारा तालुक्यातील बौध्द बांधवांनी बुधवारी (ता. एक) भेट देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन देऊन मराठा समाजाला तत्काळा आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला समर्थन देण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. उपोषणाला व आरक्षण मागणीला तालुक्यातील बौद्ध बांधवांनी जाहीर पाठींबा दिला आहे. दरम्यान, बौध्द बांधवांनी बुधवारी उपोषणस्थळी जाऊन मराठा बांधवांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी ज्येष्ठ नेते हरीष डावरे यांनी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे सांगत आरक्षणाच्या लढाईत बौध्द समाज सोबत असल्याचे ते म्हणाले. यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळणे व त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील व देशातील मराठा समाज बांधवांकडू आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेता मराठा समाज बांधवांना आरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी हरीष डावरे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, विजय वाघमारे, मुकेश सोनकांबळे, सुधाकर गायकवाड, दिगंबर कांबळे, उत्तम भालेराव, तानाजी माटे, गोळाप्पा कांबळे, कमलाकर सिरसाट, अण्णाराव कांबळे, काकासाहेब भंडारे, तुकाराम वाकळे,
तात्याराव कांबळे, रवीकिरण बनसोडे, बालाजी माटे, शरद मस्के, काशिनाथ कांबळे तसेच अमोल बिराजदार, महेबूब गवंडी, शेखर पाटील, महादेव धारूळे, महेश गोरे, सचिन रसाळ उपस्थित होते.





