विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी आठवडे बाजारात खरेदीचा घेतला अनुभव

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्य विद्यार्थ्यांनी मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी धानुरी येथील आठवडे बाजारास भेट देऊन भाजीपाला खरेदीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी बाजार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश शाळेची ओळख उपक्रमशील शाळा म्हणून आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शिक्षकवृंद नेहमी प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या वतीने “आठवडे बाजार भेट” उपक्रमा अंतर्गत धानुरी येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांना पालेभाज्यांची खरेदीची मुभा दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आठवडाभरासाठी लागणाऱ्या सर्व पालेभाज्यांची खरेदीबरोबरच कपड्यांचीही खरेदी केली. आपण स्वत: काहीतरी खरेदी करतोय या अनुभवाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र याेळी पहायला मिळाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बाजारातील शेतकरी, व्यापारी यांच्याशी संवाद साधला. बाजारामध्ये भाजीपाला येण्यापूर्वी शेतकऱ्यांना किती मेहनत व कष्ट सोसावे लागते याची माहिती जाणून घेत त्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. खरेदी केलेल्या वस्तुंचा सर्व हिशोब मुलांनी लिहून ठेवला. आठवडे बाजारास विद्यार्थ्यांनी भेट देऊन खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. यासाठी शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला.




