काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी श्यामसुंदर तोरकडे

लोहारा (जि. धाराशिव): काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याने मागील काही महिन्यांपासून निवड रखडली होती. अखेर काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी श्यामसुंदर तोरकडे यांची वर्णी लागली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी निवडीचे पत्र देऊन तोरकडे यांचा सत्कार केला. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुकाध्यक्षपद मागील आठ ते नऊ महिन्यांपासून रिक्त होते. पडझडीमुळे पक्षाला तालुक्यात उतरतीकळा लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने घवघवित यश संपादन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे बळ वाढले. त्यामुळे तालुकाध्यक्ष पदावर अनेकांनी दावा केला होता. बाबासाहेब जाधव, नितीन पाटील, श्यामसुंदर तोरकडे, इस्माईल मुल्ला यांच्यात अध्यक्षपदासाठी रेस होती. त्यामुळे निवड रखडली होती. अखेर सर्वांच्या सहमीतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी श्यामसुंदर तोरकडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली. बेंबळी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये तोरकडे यांना निवडीचे पत्र दिले. त्यानंतर त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत साखरे, तालुका सरचिटणीस इस्माईल मुल्ला, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस ब्रह्मानंद पाटील, संगमेश्वर माशाळकर, बसवराज पाटील वकील, भुजंगराव देशमुख, प्रकाश लोभे, शिवानंद तोरकडे आदी उपस्थित होते.





