राजकिय

अर्चना पाटील यांच्या विजयासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली

जेवळी, माकणी, सास्तूर येथे जाहीर सभा

लोहारा (जि. धाराशिव): धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढू लागला आहे. तीसपेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना राणारणजितसिंह पाटील या प्रमुख उमेदवारांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उमरगा-लोहारा तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूरचे आमदार राणारणजितसिंह पाटील,  जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघात संयुक्त प्रचारसभा घेत अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. संयुक्त प्रचारसभा होत असल्याने नागरिकांचा सभेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, सास्तूर या ठिकाणी शनिवारी सायंकाळी सभा घेण्यात आल्या. माजी मंत्री बसवराज पाटील जेवळी येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम काम करीत आहेत. ते देशाचं एक कणखर नेतृत्व आहे. जगातिकस्तरावर त्यांना चांगला मान आहे. त्यांच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. ‘सबका साथ सबका विकास, सबका प्रयास’ हे ब्रीद घेऊन नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खसदार रविंद्र गायकवाड, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार यांनी यावेळी भाषण करून मतदान करण्याचे आवाहन केले. प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी दौलतप्पा तोडकरी होते. जितेंद्र शिंदे, अभय चालुक्य, मोहन पणुरे, व्यंकट कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शनिवारीरात्री माकणी, सास्तूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी भाजपचे उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन दयानंद गिरी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close