ईतर
बेकायदेशीर घनकचरा प्रकल्प हटविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन

लोहारा (जि. धाराशिव): शहरात उभारण्यात आलेला बेकायदेशीर घनकचरा प्रकल्प हटवून नगरपंचायतीच्या दोषी पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी मागील चार दिवसांपासून लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहरवासीयांच्या वतीने शुक्रवारी (ता. २३) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातील शासकीय धान्य गोदामाजवळ नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पाची जागा मालकीची नसताना नगरपंचायतीने कोणतीही परवानगी न घेता शासकीय जागेवर बेकायदेशीर प्रकल्प उभारला आहे. गोदामाच्या आजूबाजूस कचऱ्याचे डंपिंग केले जात असल्याने उष्ण वाऱ्यामुळे प्रकल्पातून उठणारे विषारी वायू व दुर्गंधी थेट गोदाममध्ये पोचत आहे. यामुळे धान्यात जंतू, बुरशी निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने धान्य गोदामाजवळ कचरा डंपिंग करू नये, अन्यथा कारवाई करण्याच्या नोटीसा नगरपंचायतीला चार वर्षांपासून बजावत आहेत; परंतु नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले.
नगरपंचायतच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, शासकीय जमिनीचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. धार्मिक स्थळे, वसाहती व धान्य गोदामाजवळील घनकचरा प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवण्यात यावा, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सोमवारपासून (ता. १९) नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरू केले आहे.
या उपोषणाला पाठिंबा देत वरिल मागण्या मान्य करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिकांसह, विविध संघटना, राजकीय पक्ष सामाजिक संघटेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

