जळकोट येथील मोतीबिंदू तपासणी शिबिरास प्रतिसाद

जळकोट (जि. धाराशिव): प्राथमिक आरोग्य केंद्र व जळकोट पत्रकार संघटनेच्या वतीने जळकोट (ता. तुळजापूर) येथे शनिवारी (ता. २४) मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १३ रूगण पात्र ठरले. नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. आनंद काटकर, जळकोट आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मधुरा ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता शिबिरास सुरवात झाली. प्रारंभी नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. आनंद काटकर यांनी उपस्थित पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पत्रकारांच्या वतीने डॉ. आनंद काटकर, डॉ. मधुरा ढोले यांचा सत्कार केला. यावेळी शिबिराच्या आयोजनाची भूमिका डॉ. आनंद काटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडली. वैद्यकिय अधिकारी डॉ. मधुरा ढोले यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. पत्रकार मेघराज किलजे, पत्रकार अरुण लोखंडे, पत्रकार संजय रेणुके यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शासनासह, राज्याचा आरोग्य विभाग, धाराशिव जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करून आभार मानले. याप्रसंगी जळकोट येथील पत्रकार संजय रेणुके, पत्रकार अरुण लोखंडे, पत्रकार सुनील माळगे, पत्रकार मेघराज किलजे, पत्रकार संजय पिसे, पत्रकार विजय पिसे, आदी पत्रकार बांधव तर आरोग्य केंद्राचे औषध निर्माता व्हनाळे, कार्यालयीन कर्मचारी पठाण, आरोग्य सेवक स्वप्निल मोगरकर, परिचर प्रविण कदम आदिंसह जळकोट व परिसरातून आलेले बहुसंख्य रुग्ण उपस्थित होते.





