नोकरभरतीतील भूकंपग्रस्त युवकांवरील अन्याय दूर करा: सातलिंग स्वामी यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

संजय रेणुके/ जळकोट:
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नोकरभरतीसाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये धाराशिव व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांना दोन टक्के कोट्यानुसार केवळ सहा जागा आरक्षित ठेवल्यामुळे भूकंपग्रस्तावर अन्याय झाला आहे. दोन टक्के कोट्यानुसार ३८ जागा आरक्षित ठेवून पुनःश्च जाहिरात काढण्याची मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने २० नोव्हेंबर २०२३ रोजी नोकरभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात एकूण एक हजार ९०३ जागा भरण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकूण १९०३ जागांपैकी भूकंपग्रस्तांच्या दोन टक्के कोट्यानुसार ३८ जागा वाट्याला येतात. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने केवळ सहा जागा आरक्षित केल्याचे दाखवून भूकंपग्रस्तांवर अन्याय केला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने मुख्य महाव्यवस्थापक ( मानव संसाधन ) यांच्या अधिकारामध्ये विद्युत सहायक या पदाच्या जाहिरातीत एकूण एक हजार ९०३ पदासाठी काढण्यात आलेली जाहिरात अन्य आरक्षित प्रवर्गानुसार भूकंपग्रस्तांसाठी आरक्षित असलेल्या एकूण दोन टक्के आरक्षणानुसार ३८ जागा राखीव ठेवून सदर जाहिरात पुनःश्च काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सातलिंग स्वामी यांनी केली आहे.

