बाबुराव माळी लिखित ‘आपला सत्येश्वर’ पुस्तकाचे प्रकाशन

सुधीर कोरे
जेवळी (जि. धाराशिव): जेवळी (ता. लोहारा) येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयाचे प्रशासकीय प्रमुख स्वर्गीय डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या जीवन चरित्रावर त्यांचे बालमित्र निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या ‘आपला सत्येश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या मानव विकास बहुउद्देशीय केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम केलेले स्वर्गीय डॉ. सत्येश्वर पाटील यांच जेवळी हे गाव आजोळ आहे. त्यांच प्राथमिक व विद्यालय शिक्षणाबरोबरच त्यांच बालपण येथेच गेले आहे. त्यामुळे जेवळी पंचक्रोशीत त्यांना एक आदराचे स्थान आहे. त्यांनी वैद्यकीय सेवेत माणुसकीचे दर्शन देत निस्वार्थ व भरीव कार्य केले आहे. या मित्राची आठवण आणि त्यांनी निस्वार्थपणे केलेले कार्य सदैव स्मरणात राहावे, यासाठी त्यांच्या जीवन चरित्रावर त्यांचे येथील बालमित्र लेखक बाबुराव पिराजी माळी यांनी ‘आपला सत्येश्वर’ हे पुस्तक लिहिले आहे. लेखक बाबुराव माळी हे शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी, सहायक आयुक्त पदाबरोबरच शिक्षणासंबंधी विविध पदावर कामे केले आहेत. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर लेखनाकडे वळले आहेत. आत्तापर्यंत त्यांची विविध विषयांवर चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘आपला सत्येश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय सत्येश्वर पाटील यांच्या स्मृतीदनी शनिवारी (ता.२०) येथील बसवेश्वर सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते झाले.
त्यानंतर लोहारा हायस्कूलचे माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी स्थापन केलेल्या ‘विद्या विकास प्रतिष्ठान लातूर’ या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून स्वर्गीय डॉ. सत्तेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ लेखक श्री. माळी यांच्या स्वतःच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या ‘डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास बहुउद्देशीय केंद्राचे’ उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय डॉ. सत्येश्वर पाटील यांना ज्ञानार्जन केलेले शिक्षक शंकर आरबळे होते. यावेळी बदामी, बागलकोट (कर्नाटक) येथील एम. आर. एन. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील, मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक विश्वास धुमाळ, सोलापूर अश्विनी रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र घुली, स्वर्गीय डॉ. सत्येश्वर पाटील यांची धर्मपत्नी उषा पाटील, सून डॉ. सुचित्रा पाटील, कन्या प्राजक्ता पाटील, लेखक बाबुराव माळी, डॉ. अशोक सोळसे, हभप शरणाप्पा कोरे, प्रा. बसवराज पणुरे, विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण पाटील यांनी केले. भारत काळे यांनी आभार मानले.





