राज्य

डॉ. आंबेडकर जयंती सोहळ्याची तालुक्यात जय्यत तयारी: लोहारा शहरात विविध उपक्रमाचे आयोजन

निळे ध्वज, टोपी, गमजांच्या मागणीत वाढ

लोहारा (जि. धाराशिव): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास ता. १४ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. जयंतीनिमित्त लोहारा शहरातील बाजारपेठेत डॉ. आंबेडकरांचे फोटो, निळे ध्वज यासह विविध साहित्याचे दुकाने थाटली आहेत. निळ्या रंगाचे गमजे, निळे ध्वज, टोपी आदींना मागणी वाढली आहे. वातावरण निर्मितीसाठी ठिकठिकाणी डिजिटल फलक आणि निळे ध्वज लावण्यात येत आहेत.
शहरासह तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. १४ एप्रिलपासून जयंती उत्सवास सुरूवात होत असल्याने विविध मंडळांनी जयंती उत्सवाची जोरदार तयारी केली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात १४ ते ३० एप्रिलदरम्यान विविध उपक्रमाने जयंती साजरी केली जाते. पंधरा दिवसांच्या काळात मिरवणूक, व्याख्यान, पोवाडे, महिला, युवकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, रक्तदान शिबिर, भीम गीतांसह प्रबोधानात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा लोहारा शहरातील मध्यवर्ती जयंती उत्वसमितीने १४ ते १६ एप्रिलदरम्यान सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात मॅरेथॉन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, महिलांसाठी खास सखी सम्राट गृहिणी स्पर्धांचा समावेश असून शाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसा या प्रबोधानात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सवाच्या अनुषंगाने पंधरा दिवस आंबेडकर अनुयायांमध्ये मोठा उत्साहा असतो. प्रत्येक घराव निळे ध्वज उभारण्यात येतात. त्यामुळे निळे झेंडे, टोपी, निळे गमजे, पंचशील ध्वज यासह विविध वस्तुंना मोठी मागणी असते. ही बाब लक्षात घेत व्यापाऱ्यांनी शहरात दुकाने थाटली आहेत. विविध आकाराचे निळे झेंडे बाजारात उपलब्ध झाली आहेत. यात पाव मीटरपासून ते पाच मीटरपर्यंतच्या आकारांचे निळे ध्वज, डोक्याला बांधण्यात येणारी जय भीमची पट्टी, दारावर लावण्यासाठी भीम तोरण, वाहनांना लावण्यात येणारे आकर्षक जय भीम स्टीकर, निळ्या रंगाच्या टोप्यासह इतर साहित्यांच्या मागणीत वाढ होत आहे. जयंती उत्सवानिमित्त आंबेडकरी अनुयायांनी नवीन कपडे खरेदीची लगबग सुरू केली आहे.
….असे आहेत शहरात कार्यक्रम…
🔸 १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ त्यानंतर ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वज वंदन, सायंकाळी ५ वाजता ‘भारतीय संविधानाला अपेक्षीत असलेले राष्ट्र अस्तित्वात आले आहे का?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा होतील
🔸 १५ एप्रिल रोजी हायस्कूल लोहारा शाळेत दुपारी ‘सखी सम्राट गृहिणी’ स्पर्धा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मध्यवर्ती जयंती उत्सव समितीकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराचे वितरण होणार आहे. याच दिवसी हायस्कूल शाळेच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रम होणार आहे.
🔸 १६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. यावेळी जयंती उत्सव समितीकडून अन्नदान करण्यात येणार आहे.
………..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close