जकेकूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त, १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल

उमरगा (जि. धाराशिव): पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरोधात धडक करवाईची मोहीम उघडल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी २३ सप्टेंबर रोजी उमरगा तालुक्यातील जकेकूर शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा मारून १६ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील सुमारे दोन लाख २८ हजार ३५५ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जकेकूर शिवारातील चौधरी कॉलनी येथे बाळू तुकाराम शिंदे यांच्या घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच उमरगा पोलिस पथकाने शनिवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास बाळू शिंदे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर छापा मारला. यावेळी तिरट नावाचा जुगार खेळताना विक्रम भानुदास माने, जितेंद्र ज्ञानोबा काळे, अमोल विठ्ठल जाधव, हितेन हरीलाल पटेल, अजित जिलानी उस्ताद, काका देविदास गायकवाड, अमोल किसन माने, बालाजी बाबुराव गायकवाड, ऋषी किशोर जाधव, तानाजी नागोराव गाडे, राम किसन तोरंबे, विलास रंगनाथ जाधव, नागेश राम पवार, राहुल धनु राठोड, सचिन गायकवाड, शरद मारेकर मिळून आले. जुगार अड्ड्यावरुन तिरट जुगाराचे साहित्यासह १२ मोबाईल फोन, तीन मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण दोन लाख २८ हजार ३५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १६ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- ४, ५ अंतर्गत उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पारेकर, सपोनि भराटे, पोलिस नियंत्रण कक्षाचे सपोनि तिगोटे, पोलीस नियंत्रण कक्ष व उमरगा पोलीस ठाणेचे अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.




