श्रमिक दिनानिमित्त शालिनी भालेराव यांचा सन्मान

पुणे, दि. १ मे: महाराष्ट्र कामगार दिनाचे औचित्य साधून आज पुणे येथे डॉ. शिवाजी भालेराव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शालिनी भालेराव यांना सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शालिनी व त्यांचे पती भारतीय लष्करातील ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव हे दोघे सामाजिक कामात अग्रेसर आहेत. सामाजिक स्तर उंचविण्यासाठी या दोघांकडून विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेने शालिनी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पुणे येथील निवास्थानी जावून शिवव्याख्याते गोपाळ माने यांच्या हस्ते शालिनी भालेराव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शालिनी भालेराव यांनी संस्थेला आर्थिक मदत जाहीर करत, “संस्थेचे कार्य अधिक व्यापक व्हावे व गरीब, वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच भविष्यात अधिक मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी ब्रिगेडियर भालेराव यांच्या भारतीय लष्करातील उल्लेखनीय सेवांचा आढावा घेतला. यावेळी शिवव्याख्याते गोपाळ माने यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमास वैशाली भालेराव, दीपिका भालेराव, सारिका भालेराव, संतोष भालेराव, मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, बालाजी मतोळे आदी मान्यवर उपस्थित होते.





