राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माध्यमे: प्रा. डॉ. महेश मोटे

उमरगा(जि. धाराशिव) : आजच्या तरुणांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव, नकारात्मकता, वाढती व्यसनाधीनता, इतरांचा द्वेष करणे, क्षमतांची जाणीव नसणे, स्वतःला न ओळखणे, अनेक गैरसमजुती आणि वाढती अंधश्रद्धेमुळे आजच्या तरुणांची प्रगती खुंटली जात आहे. परंतु, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाला चालना मिळते. ज्यामुळे तरुणांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माध्यमे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. उमरगा तालुक्यातील बोरी येथे शुक्रवारी (ता. २) रोजी श्री. शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालयच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाईचाकूरच्या समाज सेवा शिक्षण संस्थेचे सचिव दिलीपराव पवार होते. यावेळी नारंगवाडीचे प्राचार्य डॉ. आर. बी. गव्हाणे, पोलिस पाटील बालाजी मदने, डॉ. विजया तांबे, डॉ. अजिंक्य पवार, पत्रकार योगेश पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, शिक्षकांनी आपले ज्ञानरूपी दान मोठ्या मनाने विद्यार्थ्याला दिले पाहिजे. संस्कार व नीती मूल्याशिवाय या जगात दुसरे काहीच नाही. मोठे झाल्यावर समाजाचे ऋण कसे फेडता येईल, याकडे लक्ष द्या. माणसाची सोबत चुकली आणि दुर्गुणाची संगत लाभली की, माणुस संपतो. वेळेचा पुरेपुर व सुयोग्य फायदा घेता आला पाहिजे. एकदा गेलेली वेळ परत मिळविता येत नाही. क्रांतिकारी विचार हे युवकच करु शकतात. हा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे. आपला देश तरुणांचा आहे. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा आदि महापुरुषांनी फार मोठे योगदान तुमच्या आमच्यासाठी दिली आहे. जो काहीतरी वेगळे समाज उपयोगी काम करतो त्यालाच समाज मानसन्मान देतो. आत्मविश्वास व सकारात्मक भूमिकेतून केलेले कोणतेही कार्य समाधान देते. सध्या अतिरेकी मोबाईलच्या वापरामुळे माणुस विकलांग होण्याच्या मार्गावर असून मोबाईलचा अतिरेकी वापर हे देखील मोठे आव्हानच आजच्या तरुणांसमोर आहे.
माणूस असे बना की, माणुसकी सुद्धा नतमस्तक होईल, शिष्य असे बना की, जग सुद्धा नतमस्तक होईल, असे शेवटी म्हणाले. यावेळी प्रा. डी. डी. पवार, टी. बी. मोरे, एस. बी. सांगवे, एस. व्ही. पाटील, आर. आर. बंडगर, महेश बाबळसुरे, डॉ. व्ही. डी. पवार, सागर वनकुद्रे यांच्यासह स्वंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. बी. गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र कांबळे यांनी केले. प्रा. पी. एन. शिंदे यांनी आभार मानले.

