राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नरदेव कदम

लोहारा (जि. धाराशिव): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते नरदेव कदम यांची निवड करण्यात आली आहे. धाराशिव येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कदम यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. याचा काही अंशी परिणाम लोहारा तालुक्यातही झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मूळ राष्ट्रवादी सोडत अजित पवार गटात सामिल झाले. असे असले तरी कार्यकर्ते मात्र शरद पवारबरोबरच राहिले. १९९३ साली झालेल्या भूकंपात शरद पवारांनी तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे मानसिक, आर्थिक पूनर्वसून करून मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली नव्हती. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवड रखडली होती. त्यामुळे तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ज्येष्ठ कार्यकर्ते नरदेव कदम यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये नरदेव कदम यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी संजय निंबाळकर, माजी सरपंच नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मुबारक गवंडी, सुनील ठेले आदी उपस्थित होते. नरदेव कदम हे सुवातीपासून शरद पवारचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. निष्ठावान कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. निवड होताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.

