लोहारा पोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल, ४१ हजारांहून अधिकची रोकड जप्त
लोहारा (धाराशिव): लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरात बुधवारी (ता. ३०) जुगारविरोधी मोहीम राबवून दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पाच आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण ४१ हजार १० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही ठिकाणच्या प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास नगरपंचायतच्या गाळ्यामध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी रफिक उस्मान शेख (वय ५२, रा. गुबाळ, ता. औसा, जि. लातूर) हा मिलनडे मटका जुगाराचे साहित्य व एक हजार ५० रुपये रोख रक्कम आपल्या ताब्यात बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई बुधवारी सायंकाळी लोहारा-जेवळी रस्त्यालगत असलेल्या शंकर सुतार यांच्या दुकानात चालणाऱ्या ऑनलाइन जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या दुकानात फन टार्गेट नावाचा जुगार खेळ चालू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी शोयब जाकीर (वय २६, रा. ईदगाह मस्जिदजवळ, लोहारा), सरुराज मैनोद्दीन भोंगळे (वय ३३, रा. बाराईमाम मोहल्ला, लोहारा), मोहसीन दात फकीर (वय २५, रा. फातीमनगर, लोहारा), हरुन हबीब सुभेदार (वय ३६, रा. आंबेडकर चौक, लोहारा) हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्या ताब्यातून फन टार्गेटसह जुगाराचे साहित्य व ३९ हजार ९६० रुपये रोख जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणाहून एकूण ४१,०१० रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलिस संयुक्त पथकाने केली.
नियमबाह्य जुगारांवर पोलिसांची नजर
लोहारा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही कारवाई पार पाडत स्थानिक गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील वाढत्या अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर असून नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी केले आहे.
……..





