लोहारा, जेवळी, आष्टामोड कडकडीत बंद; परभणी संविधान अवमान प्रकरण

लोहारा (जि.धाराशिव): परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीकृतीची नासधूस केल्याच्या घटनेचा व सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनयुयायांनी सोमवारी (ता. १६) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोहारा शहरासह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला.परभणी येथील एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीकृतीची नासधूस करून संविधानाचा अवमान केला होता. या घटनेच्या निषेधार्थ परभरणी शहरातील संविधान प्रेमी नागरिकांनी मोर्चा काढला होता. मात्र, मोर्चाला हिंसक वळण लागल्याने जाळपोळ झाली. पोलिसांनी भीमसैनिकांना अमानुष्य मारहाण करण्यात आली. तसेच कोम्बिग ऑपरेशन करून निरापराध तरूणांना जेलमध्ये डांबण्यात आले. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला लोहारा तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील आंबेडकरवादी संघटानांचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी एकत्रीत आले. प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहर बंद करण्याचे आवाहन केले. याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर दुकाने बंद ठेवली. तसेच तालुक्यातील सालेगाव, जेवळी, आष्टामोड या मोठ्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, सूर्यवंशी या तरूणाच्या मृत्यूची एसआटीमार्फत चौकशी करण्यात यावी, त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक साहय्य करावे, मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, पीडित कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नौकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, बालाजी माटे, सुमीत कांबळे, तानाजी माटे, तात्या कांबळे, प्रीतम शिंदे, अमीत सुरवसे, हमजा खुटेपड, स्वप्नील माटे, संभाजी सुरवसे, अक्षय माटे, विनोद थोरात, बाबाजी थोरात, किशोर भालेराव, निवृत्ती थोरात,अलताब सुंबेकर, अंकुश भंडारे, अरबाज फकीर, राजू ढगे, सूरज माटे, ओंकार कांबळे, साबीर सय्यद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

