“कर्जमाफी फक्त निवडणुकीपुरती, अंमलबजावणी मात्र शून्य!” : स्वराज्य पक्षाचा सरकारवर हल्लाबोल
लोहारा शहरात केला रस्तारोको आंदोलन

लोहारा (जि. धाराशिव): “निवडणूक आली की गोड गोड आश्वासनं, निवडून आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम सरकार करतंय,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या नेत्यांनी आज लोहारा येथे झालेल्या उग्र रस्तारोको आंदोलनात केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणांचा निषेध करत आक्रोश केला.
“शेतकऱ्यांच्या मरणावर राजकारण करणाऱ्यांना सत्ता मिळाल्यावर त्यांची चिंता संपते. पण शेतकरी मात्र रोज जगण्यासाठी झगडतोय,” अशा शब्दांत स्वराज्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे यांनी सरकारला फटकारले. कर्जमाफी, हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी याबाबत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी शून्य असून, शेतकरी फसवले गेलेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
राज्यात आतापर्यंत ५०,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि सरकार केवळ आकड्यांची खेळ मांडून बघ्याची भूमिका घेतंय, हे अत्यंत लाजीरवाणं आहे. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर पेरणीपूर्वी मोफत व वेळेवर बी-बियाणे व खते मिळाली पाहिजेत, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचं लेखी आश्वासन सरकारने द्यावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.
“मतं मागताना शेतीमालाला हमीभाव द्यायचं म्हणणारे आता कुठे गायब झाले?” असा सवाल करत आंदोलकांनी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. तसेच कृषीमाल व पूरक वस्तूंची आयात थांबवून स्थानिक उत्पादनास चालना द्यावी, कृषी योजनांचा पारदर्शक लाभ मिळावा, व फळबाग योजनेंतील अनुदान वाढवावे, यासाठीही सरकारला जाब विचारण्यात आला. हे निवेदन नायब तहसीलदार नाना मोरे यांच्याकडे देण्यात आले. या आंदोलनात महेश गोरे, तानाजी पाटील, प्रशांत थोरात, बळी गोरे, युवराज तोडकरी, निशिकांत कांबळे, संजय मुर्टे, देविदास बिराजदार संजय मुर्टे, मुरलीधर मोरे, श्रीकृष्ण गंगणे, संजय माने, अरुण मोरे, रंगनाथ तोडकरी, ईश्वर मोरे, प्रभाकर मोरे, राम सूर्यवंशी यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.





