शैक्षणिक

कल्पना चौरे बनल्या ग्रामीण विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान!

शिक्षकदिन विशेष....

लोहारा (जि. धाराशिव): ग्रामीण भागात आजही मुलींच्या शिक्षणात परिस्थितीच अडसर ठरू लागल्याचे चित्र आहे. अशा वेळी मुलींना उक्तीचा आणि कृतीचा आधार देऊन परिस्थितीवर मात करायला भाग पाडणारे शिक्षक समाजभिमुख बनतात. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरतात. सास्तूर येथील शक्षिका कल्पना चौरे या ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील शिक्षिका कल्पना चौरे या येथील जिल्हा परिषद प्राथमिक सास्तूर शाळेत ज्ञान दानाचे काम करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी जालना जिल्ह्यातील बानगाव (ता. अंबड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २००३ ते २००७ या कालावधित ज्ञानदान केले. तेथून झालेल्या बदलीनंतर लोहारा तालुक्याती कोंडजीगड आणि बलसूर येथे सेवा केली. त्यानंतर कल्पना चौरे या २०१८ मध्ये सास्तूर जिल्हा परिषद शाळेत बदलून आल्या. शाळेत आल्या तेव्हा शाळेचा पट ६७ इतका होता. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत असल्याने आजघडीस शाळेचा पट १५० च्या जवळपास झाला आहे. पूर्वीच्या नावाप्रमाणे कन्या शाळा संबोधल्या जाणाऱ्या या शाळेत मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात शैक्षणिक स्थिती अद्यापही फारसी सुधारलेली नाही. परिस्थिती मुलींच्या अडचणीची ठरू लागल्याने कल्पना चौरे यांनी मुलींना उक्तीचा आणि कृतीचा आधार दिला. या आधाराने मुली परिस्थिवर मात करीत शाळेत नियमित येऊन ज्ञानार्जन करू लागल्या आहेत. होतकरू मुलींच्या आयुष्यावर मायेची पाखर धरत त्यांच्या शिकण्याचा मार्ग सुकर बनला आहे. त्यामुळे कल्पना चौरे या शिक्षिका ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थिनीसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. शिक्षणाबाबत एक सकारात्मक दष्टीकोन जागृत करण्याच कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्याचा बरोबर वापर करून मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. कल्पना चौरे आपल्या वीस वर्षाच्या दीर्घ सेवेच्या कालखंडामध्ये शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विध्यार्थी तालुकास्तरावर चमकले आहेत. त्यांनी विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम शाळेत राबविले आहेत. यामध्ये इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविणे, किल्ले बनविणे व त्यांची माहिती जोपासणे, राख्या तयार करणे, कागदाच्या विविध वस्तू तयार करणे, परिसर भेट देणे, विविध नेत्यांची व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यामध्ये भाषणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक सहलीमध्ये उत्साहाने भाग घेऊन विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहणे, यासारखे कृतिशील उपक्रम राबवून त्यांनी शाळेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. आपल्या आनंददायी कृतिशील आणि मनोरंजनात्मक अध्यापन पद्धतीमुळे मुलांच्या आवडत्या शिक्षिका आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याला सामाजिकतेची किनार आहे. महिला मेळावे, महिलासाठी आरोग्य विषयक माहितीतून महिलांमध्ये समाजजागृती, व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांमार्फत नाटिका सादर करून जनजागृती करणे, मुली वाचवा देश वाचवा यासाठी विविध उपक्रम तसेच शाळा, गावातील परिसरामध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनासाठी जनजागृतीचा संदेश, स्वच्छतेविषयी मुलांना सखोल मार्गदर्शन यासारख्या उपक्रमामधून प्रयत्नशील राहून त्यांनी शैक्षणिक सेवेबरोबरच सामाजिकता जोपासली आहे. शिक्षण सेवेचे हे व्रत जोपासताना त्या म्हणतात, लहान विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार बिंबवून त्यांना जीवन जगण्यास सक्षम बनविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, याचा मला अभिमान आहे. त्यांना मूल्य आधारितसुसंस्कारी, विज्ञानवादी शिक्षण देवून एक सुजाण नागरिक बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही एक प्रकारे राष्ट्र सेवा आहे, यामध्ये आपण खारीचा वाटा उचलतो आहे, याचा आनंद आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close