शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोहारा बाजार समितीच्या माजी सभापती पुत्राविरोधात गुन्हा दाखल

लोहारा (जि. धाराशिव): शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर जावळे-पाटील यांंचे पुत्र विनोद जावळे-पाटील यांच्याविरोधात शंकराराव जावळे-पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यानी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा शहरात शंकराराव जावळे-पाटील महाविद्यालय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत प्रथम सेमीस्टरच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने शंकराराव जावळे-पाटील महाविद्यालयाला भूकंपकाळात जिल्हाधिकारी यांनी बांधून दिलेल्या पत्र्याच्या शेड्ची दुरूस्तीचे काम करण्यासाठी प्रचार्य डॉ. शेषेराव जावळे यांनी महाविद्यालयाचे लिपीक मनोज पाटील यांना बालाजी वाघमारे, सागर शिंदे, दत्ता सुरवसे यांना घेऊन पत्रा शेड्ची दुरूस्ती करण्यास सांगितले. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास दुरूस्ती करीत असताना विनोद दिनकर जावळे-पाटील (रा. नागूर ता. लोहारा) हे येऊन मजुरांशी हुज्जत घालून दुरूस्तीचे काम थांबविले. याबाबत महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. शेषेराव जावळे यांनी विनोद जावळे यांना पत्रा शेड् दुरूस्तीचे काम का थांबविले याचा जाब विचारला असता विनोद जावळे यांनी प्राचार्य डॉ. जावळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत त्यांचा शर्ट फाडून मारहाण केली. याबाबत डॉ. शेषेराव जावळे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विनोद जावळे यांच्या विरोधात कलम- ३५३, ३३२, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

