स्मशानभूमीची जमीन म्हाडाला दिल्याच्या निषेधार्थ जेवळी येथे बेमुद उपोषण; वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा

लोहारा (जि. धाराशिव):
जेवळी (ता. लोहारा) येथील लिंगायत स्मशानभूमीची गावठाणातील आरक्षित जमीन अनधिकृतपणे वृक्षारोपणासाठी म्हाडाला हस्तांतरित करण्यात आल्याच्या निषेधार्थ श्यामसुंदर तोडकरी यांनी सहकाऱ्यांसह बेमुद उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.
ग्रामपंचायतीकडून ४० आर इतकी स्मशानभूमी आरक्षित जमीन म्हाडाला देण्यात आल्याचा आरोप लिंगायत समाजाने केला आहे. समाजाची पाच एकर जागेची मागणी प्रलंबित असताना ही आरक्षित जमीनच हस्तांतरित झाल्यामुळे वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर तोडकरी यांनी उपोषणास सुरुवात केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अरुण गरड, जिल्हा संघटक विकास बनसोडे, बी. डी. शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, जिल्हा संघटक रुक्मिणी आव्हाड, तसेच जीवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे उपस्थित होते.





