स्पर्श ग्रामीण रुग्णालयात मोफत दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया शिबीर
७ ते ८ ऑक्टोंबर रोजी होणार शिबीर

लोहारा (जि. धाराशि व): तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उद्या ता. ७ ते ८ ऑक्टोंबरदरम्यान दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ० ते १४ वयोगटातील दिव्यांग बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी केले आहे.
सास्तूर ग्रामीण रग्णालय, निवासी दिव्यांग शाळा यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लंडन रोटरी क्लब कोव्हेन्ट्री, अंबरनाथ, देवनार येथील रोटरी क्लब, चेंबूर येथील सरस्वती प्रतिष्ठान, पंढरपूर येथील प्रशांतराव परिचारक फाउंडेशन यांच्या पुढाकारातून लंडन, मुंबई येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते दिव्यांग (अपंगत्व) असलेल्या ० ते १४ वयोगटातील बालकांवर मोफत शस्त्रक्रिया या दोन दिवसीय शिबिरात करण्यात येणार आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या १४ शिबिरामध्ये एक हजार ३०० पेक्षा अधिक दिव्यांग बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेली बालके स्वतःच्या पायावर आधार शिवाय उभी आहेत, चालत आहेत. शिबिरामध्ये अपंग बालकांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सर्व मोफत केली जाणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन येताना फक्त चहा किंवा दुध बिस्कीट खाऊ घालावे. परिसरातील जास्तीत जास्त बालकांच्या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





