ईतर

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला ज्ञानज्योती महिला पतसंस्थेकडू एक लाखाचे अर्थसहाय्य

लोहारा (जि. धाराशिव): संकट काळात सहकार्याचा हात देत सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेने एक आदर्श घालून दिला आहे. कास्ती खुर्द येथील मंगल चक्रधर कदम या महिलेला व्यवसायासाठी पतसंस्थेच्या लोहारा शाखेकडून ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचे अपघातात निधन झाले. याच कर्जावर संस्थेने विमा संरक्षणाच्या स्वरूपात १ लाख रुपयांची अपघात विमा पॉलिसी घेतली होती.

मंगल कदम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे व आर्थिक संकटाचे सावट कोसळले. ही स्थिती ओळखून ज्ञानज्योती महिला सह. पतसंस्थेच्यावतीने मंगलबाईंच्या पती चक्रधर कदम यांना अपघाती पॉलिसीची रक्कम म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेच्या लोहारा येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला.

हा धनादेश माजी आमदार मा. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या अध्यक्षा ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा सारिका प्रमोद बंगले, सचिव मिरा अविनाश फुलसुंदर, संचालिका तथा नगराध्यक्षा वैशाली खराडे, संचालिका सुनिता अरुण जगताप, सुमन दीपक रोडगे, संचालिका मुमताज अमिन सुंबेकर, भागवत पवार, बालाजी जगदाळे, कर्मचारी अनुष्का पाटील, अनिकेत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे चक्रधर कदम आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. त्यांच्या वतीने समाधान व्यक्त करताना पतसंस्थेचे आभार मानण्यात आले. कर्ज घेताना विमा संरक्षण किती महत्त्वाचे ठरते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या निमित्ताने ज्ञानज्योती महिला सह. पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहार पुरवणारी संस्था न राहता, संकटसमयी ग्राहकाच्या पाठीशी उभी राहणारी आधारस्तंभ संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे. संस्थेच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close