आष्टाकासार येथे आत्मा यंत्रणेमार्फत स्वामी समर्थ सेंद्रिय गटाची स्थापना
गटाच्या अध्यक्षपदी सिद्रामप्पा तडकले

लोहारा (जि. धाराशिव): सेंद्रिय शेती केल्यामुळे विषमुक्त अन्न मिळते शिवाय जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे रासायनिक शेतीकडून आता सेंद्रीय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तालुक्यातील आष्टाकासार येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वामी समर्थ या नावाने सेंद्रिय गटाची स्थापना शुक्रवारी (ता. सहा) केली आहे.
कृषी व संलग्न विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत तालुक्यातील आष्टाकासार येथे स्वामी समर्थ सेंद्रिय गटाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कैलास पवार, कृषी सहायक सचिन पवार, कळंब येथील सोनारवाडीचे शेतकरी उमेश मोराळे, विक्रम घोळवे, उपसरपंच राजेंद्र घोळवे यांची उपस्थिती होती. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कैलास पवार
यांनी येथील शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून गटाची संकल्पना, फायदे, महत्त्व याबद्दल माहिती दिली. त्यानंतर स्वामी समर्थ या नावाने गटाची स्थापना केली. गटात २३ शेतकऱ्यांनी नोंदंणी केली आहे. यावेळी गटाची कार्यकारणीची निवड करण्यात आली. सिद्रामप्पा तडकले यांची अध्यक्षपदी सर्वानमुते निवड केली. सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन शिवमूर्ती फुंड्डीपल्ले यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी तानाजी कागे यांची निवड करण्यात आली. बैठकीनंतर याच ठिकाणी राजमा पिका बद्दल व त्याची लागवड, बी-बियाणे, सेंद्रिय निविष्ठा, पाणी व्यवस्थापन या याची सविस्तर माहिती सोनारवाडी येथील शेतकरी उमेश मोराळे, विक्रम घोळवे यांनी दिली. जास्तीत जास्त राजमाचे उत्पन्न काढण्यासाठी काय करावे, यावर सविस्तर चर्चा केली. सोनारवाडीचे उपसरपंच राजेंद्र घोळवे, प्रदीप घोळवे यांनी राजमा पेरणी पासून ते काढणी पर्यंतचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिली. यावेळी आष्टाकासार येथे राजमा पिकाचे उत्पन्न गत वर्षांपासून घेण्यात येत आहे. यंदा राजमा पिकाची लागवड १०० एकरपेक्षा जास्त होण्याची शक्यता सिद्राम तडकले यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली. यावेळी शिवमूर्ती फुंड्डीपल्ले, तानाजी कागे, गहिनीनाथ कागे, मुकेश मुळे, शरणाप्पा कुडूकले, अंदानी टिंकांबरे, मुकेश सोमवंशी, तात्या सोमवंशी, बालाजी काळे, तंटामुक्ती अध्यक्ष योगीराज आळंगे, जयंत अष्टेकर, बालाजी कोरे, सोनू कासार, दया पाटील, विजय टिकाबरे, बालाजी औटी, चंद्रकांत कासार, प्रदीप कोरे, योगीराज कुडुकले, जिनेन्द्र कासार यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक सचिन पवार, स्वामी समर्थ सेंद्रिय गटातील शेतकऱ्यांनी केले. लहू गायकवाड यांनी आभार मानले.





