चोवीस लाखाचा गुटखा जप्त; लोहारा पोलिसांची कारवाई

लोहारा (जि. धाराशिव): गुटखा विक्रीला बंदी असतांना बेकायदा वाहतूक करणारा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप गुरूवारी (ता. २७) पोलिसांनी पकडला. वाहनासह २३ लाख ७२ हजार ४८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या पथकाने केली.
गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक कुकलारे यांचे पथक शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी उमरग्याहून लोहारा शहरात महिंद्रा बोलेरो पिकअप ( क्र. एमएच २५- एजे ५९६६) बंदी असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखूची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कुकलारे यांच्या पथकाने सापळा रचला. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा (खुर्द) गावाजवळ बोलेरो पिकअप पकडला. वाहानाची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये १४ लाख ९७ हजार ६०० रूपयांचा विमल गुटखा, ७४ हजार ८८० रूपयांचे तंबाखूजन्य पदार्थ, दोन लाख ६२ हजार ५०० रूपयांचा रजनीगंधा पान मसाला, ३७ हजार ५०० रूपयांचा नवरत्न पान मसाला मिळून आला. वाहानासह २३ लाख ७२ हजार ४८० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपी अशोक मुर्गे (वय २४, रा. धनेगाव जि. बीड) यास अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विनोद जोकार, निरंजन माळी, आकाश भोसले, नागेश राजपूत यांनी केली.
पोलिसांनी सुमारे पावणेचार लाखांचा गुटखा पकडला आहे. लोहारा पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. लोहारातून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जाते; मात्र याकडे तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांकडून काणाडोळा केला जात होता. त्यामुळे गुटखा माफियांचे चांगलेच फावले जात होते. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंद्याविरोधात मोहीम हाती घेती आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
..….

