राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन विद्यालयाने मिळविले सुवर्णपदक: सुवर्णपदकाची केली हॅटट्रीक

मुरूम (जि. धाराशिव): येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून हॅटट्रीक साधली आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय स्पर्धा पारपडल्या. विजेत्या खेळाडूंची पश्चिम बंगाल राज्यातील चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघातील खेळाडू आयर्न तानाजी बिराजदार, अर्जुन तानाजी बिराजदार, अदित्य विजय खामकर, सम्मेद सतीश वेदपाठक, रोहन महादेव महामुनी यांनी प्रथम क्रमांक मिळवित हॅटट्रिक मारत सुवर्णपदक पटकाविले आहे. या विजयी खेळाडूंची पश्चिम बंगाल राज्यातील चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, प्राचार्य करबसप्पा ब्याळे, उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे आदींनी विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक प्रा. नारायण सोलंकर, सुजीत शेळके यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.





