रास्ता रोको आंदोलकांवर गुन्हे दाखल; गुन्हे मागे घ्या, अन्यथा जेल भरो आंदोलन करू

लोहारा (जि. धाराशिव): मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या तालुक्यातील हिप्परगा रवा, धानुरी या गावातील एकूण १२ आंदोलकांवर लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे सकल मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने सोमवारी (ता.२६ फेब्रुवारी) धानुरी येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे.
लोहारा तालुक्यात सदैव शांतता राहिली आहे. मराठा समाज प्रत्येक आंदोलनात पोलिस प्रशासन व तालुका प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत आहे. परंतु, २४ फेब्रुवारीला आरक्षणासाठी मराठा समाजाने शांततेत रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लोहारा पोलिस प्रशासनाने आंदोलकावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला आहे. दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अन्यथा जेल भरो आंदोलन करू, असा इशार बैठकीत दिला आहे. या बैठकीस मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
हिप्परगा रवा येथील सागर नारायण नरगाळे, तुकाराम नामदेव लोमटे, खंडू संतोष गवळी, मनोज निवृत्ती गवळी, सुनील बब्रुवान जाधव, विकास नारायण नरगाळे (सर्व रा. हिप्परगा रवा) धानुरी येथील विठ्ठल केशव बुरटुकणे, अभिजीत अजित साळुंके, विनोद कोंडीबा साळुंके, श्रीकांत एकनाथ जाधव, सुरज गोविंद साळुंके, (सर्व रा. धानुरी) धनराज विश्वनाथ बिराजदार, (रा. जेवळी) यांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केल्यावरून या १२ जणाविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
………




